
2020-01-07T07:31:39
वृक्षासन | Tree Pose -कुठलंही काम करताना सर्वाधिक आवश्यकता असते ती एकाग्रतेची. एकाग्रता असेल तर यशाच्या दिशेनं पाऊल पुढे पडतं. म्हणूनच एकाग्रता आणि संतुलन शक्ती वाढवणाऱ्या वृक्षासनाची माहिती आपण घेऊ. - हे आसन पायांना मजबुती आणि स्थिरता देतं. यामुळे मज्जासंस्थेला बळ मिळतं. - कंबर आणि पार्श्वभागाजवळचे स्नायू मजबूत होतात. - सातत्यानं वृक्षासन करत राहिल्यानं मन शांत आणि एकाग्र होऊ लागतं. शरीराची संतुलन शक्ती हळूहळू वाढते. - आत्मविश्वास आणि स्थिरता यांचा विकास होतो. तन आणि मनाला स्फूर्ती मिळते. वृक्षासन करण्याची कृती - • हात शरीराच्या बाजूला ठेऊन ताठ उभे राहूया. • उजवा पाय उचलून वाकवून उजवे पाऊल डाव्या मांडीच्या खालील भागात घट्ट रोऊन उभे राहूया. • डावा पाय ताठ आहे नां, याची खात्री करा. तोल सांभाळा. • एकदा तोल प्राप्त झाल्यावर दीर्घ श्वास घेत आरामात दोन्ही हात डोक्याच्यावर नेऊया. तळहात एकत्र जुळवून नमस्ते मुद्रा करूया. • थोड्या अंतरावरील एखाद्या गोष्टीवर नजर स्थिर करा, नजर स्थिर राखल्याने तोल सांभाळता येतो. पाठीचा कणा ताठ आहे नां, शरीर रबरासारखे ताणलेले असुद्या. दीर्घ श्वसन सुरु ठेवा. प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर शरीर आणखी विश्राम करत राहूया. चेहऱ्यावर सुंदर हास्य ठेवत आपले लक्ष शरीर आणि श्वासावर राहूद्या. • संथ श्वास सोडत हात शरीराशेजारी खाली घेऊन येऊया. उजवा पाय खाली आणूया. • हात शरीराशेजारी ठेवत ताठ उभे राहूया. आत्ता डावा पाय उजव्या मांडीवर नेत हे आसन परत करूया. • तज्ज्ञांच्या देखरेखेखाली हे आसन करावं. वृक्षासानाचे लाभ - - या आसनामुळे नवचैतन्य निर्माण होते, पाय, पाठ आणि हातांमध्ये ताण निर्माण होऊन तरतरी निर्माण होते. - आपल्या मनामध्ये समतोल निर्माण होतो. - एकाग्रता वाढण्यास मदत होते. - सायटीकाच्या काही रुग्णांना या आसनामुळे आराम मिळाला आहे. - यामुळे पाय मजबूत बनतात, तोल राखता येतो आणि कंबर खुली होते. - सायटिका बरा होण्यास मदत होते. वृक्षासन कोणी करू नये - - जर तुम्हाला अर्ध शिशी, जागरणाचा त्रास असेल, कमी अथवा उच्च रक्तदाब, कंबरेचं दुखणं, स्लिप डिस्क आणि गुडघ्यांचं दुखणं यापैकी कुठलाही त्रास होत असेल तर हे आसन करू नये.